Sourav Ganguly: टीम इंडियाने आतापासूनच मिशन वर्ल्डकपची सुरुवात केली आहे. यंदाच्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ भारतात होणार आहे. ही भारतासाठी एक सुवर्ण संधी मानली जात आहे. तसेच गेल्या १० वर्षांचा वर्ल्ड कप जिंकण्याचा दुष्काळ यानिमित्ताने टीम इंडिया संपवू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यातच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर काही टिप्स दिल्या आहेत.
सौरव गांगुलीने सांगितले की, टीम इंडिया कधीही कमकुवत होऊ शकत नाही. कारण टीम इंडियामध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. एवढेच नाही तर, अनेक खेळाडूंना संघात खेळण्याची संधीही मिळत नाही. राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि निवडकर्त्यांनी वर्ल्डकप होईपर्यंत या संघासोबत खेळत राहावे अशी माझी इच्छा आहे, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे.
कोणताही ताण-तणाव न घेता बिनधास्त खेळा
टीम इंडिया जेव्हा वर्ल्डकप खेळायला सुरुवात करेल, तेव्हा खेळाडूंनी तणावरहित खेळ करावा. कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव न घेता बिनधास्त खेळावे. वर्ल्डकप जिंको किंवा न जिंको, चांगले क्रिकेट खेळले पाहिजे. शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू टीम इंडियात आहेत, असा संधी कधीही कमजोर ठरू शकत नाही, असा विश्वास सौरव गांगुलीने व्यक्त केला.
दरम्यान, टीम इंडियाने २०२३ च्या वनडे वर्ल्डकपसाठी तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाने आधी श्रीलंकेविरुद्ध आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका जिंकली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातत्याने पुढे जात आहे. यामुळे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी होते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागेल आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"