T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वात (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर बदल केले जाणार आहेत हे तर आधीपासूनच निश्चित आहे. कर्णधार कोहलीनं भारताच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचं नेतृत्त्व करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. आता वर्ल्डकपमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाच्या ट्वेन्टीसह वनडे संघाच्या नेतृत्त्वातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्त्व कुणाकडे दिलं जाईल याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. तरी स्वाभाविकपणे रोहित शर्मा (Rohit Sharma) याचं नाव आघाडीवर आहे. तरीही बीसीसीआयकडून सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. यातच बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी मोठं विधान केलं आहे. रोहित शर्मा जरी निवड समितीची पहिली पसंती असला तरी तो जास्त वेळ योजनेचा भाग नसेल, असं सरनदीप सिंग म्हणाले आहेत.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघ लगेचच न्यूझीलंड विरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. यात पहिल्यांदाच भारतीय संघाला नवा कर्णधार प्राप्त होणार आहे. बीसीसीआयच्या निवडसमितीच्या बैठकीत संघातील खेळाडूंसोबतच कर्णधाराचीही निवड केली जाणार आहे. रोहित शर्मा याच्याकडेच संघाचं नेतृत्त्व दिलं जाईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण या मालिकेत रोहित शर्मा संघाचा भाग असणार की नाही याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही. असं असलं तरी ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे असेल हे पक्क मानलं जात आहे.
दरम्यान, ३३ वर्षीय रोहित शर्माचं वय आणि येत्या काही वर्षात भारतीय संघात होणारे अमूलाग्र बदल याचा विचार करता संघाचं नेतृत्त्व देखील भविष्याचा विचार करुन नव्या खेळाडूकडे दिलं जावं अशा चर्चेनं जोर धरला आहे. "रोहित शर्मा एक चांगला पर्याय आहे यात काहीच शंका नाही. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. पण निवड समितीला हे ठरवावं लागेल की त्यांना पुढील काही वर्षांसाठी कर्णधार हवाय की अशा खेळाडूवर जबाबदारी द्यावी की जो बऱ्याच काळासाठी संघाचं नेतृत्त्व सांभाळू शकतो. जर ते खूप पुढचा विचार करत असतील तर केएल राहुल किंवा ऋषभ पंत एक चांगला पर्याय ठरू शकतात", असं सरनदीप सिंग म्हणाले.
Web Title: Former BCCI selector Sarandeep Singh Says Rohit Sharma can't be long term captaincy option
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.