भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विद्यमान भारतीय संघातील खेळाडूंवर सडकून टीका केली आहे. विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराने भारतीय खेळाडूंमध्ये असलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. पण, खेळाडू स्वतःला सर्वज्ञ समजतात त्यांना असे वाटते की आपल्याला सर्वकाही माहित आहे. त्यांना कोणाचा सल्ला घेण्याची गरज वाटत नाही, अशा शब्दांत कपिल देव यांनी ताशेरे देखील ओढले.
मतभेद प्रत्येकामध्ये आहेत, पण आताच्या भारतीय खेळाडूंमधील चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यात खूप आत्मविश्वास आहे. पण, नकारात्मक गोष्ट अशी की त्यांना वाटते की आम्हाला सर्वकाही माहिती आहे, असे कपिल देव यांनी म्हटले. ते 'द वीक' या वृत्तसंस्थेशी बोलत होते. "भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची अजिबात कमी नाही. पण, अनेकदा त्यांना असे वाटते की, एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे म्हणून ते इतरांना काहीच विचारत नाहीत. अर्थात अनुभवी खेळाडूंचा सल्ला घेत नाहीत. त्यामुळे मला असे वाटते की, अनुभवी व्यक्ती नेहमी त्यांची मदत करू शकतो", असे कपिल देव यांनी नमूद केले.
कपिल देव यांनी सुनावले तसेच पैशांसोबत अहंकार देखील येत असतो. काही खेळाडूंचा अहंकार तर सुनिल गावस्कर यांसारख्या दिग्गजांचा सल्ला घेण्यापासून देखील रोखतो. अनेकदा असे होते की, पैसे जास्त आल्यामुळे अहंकारही येतो. या क्रिकेटपटूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे. हा देखील मोठा फरक आहे, असेही देव यांनी सांगितले.
भारताचा दारूण पराभव वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेत विजयी सलामी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.दुसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाने सांघिक खेळी करत भारताला ४०.५ षटकांत १८१ धावांवर सर्वबाद केले. १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजने ३६.४ षटकांत ४ बाद १८२ धावा करून विजय साकारला.