Kapil Dev on Shreyas Iyer and Ishan Kishan: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वार्षिक करार यादी जाहीर केली असून इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना डच्चू दिला आहे. देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य न दिल्यानं हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे. अशातच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी इशान आणि श्रेयस यांच्यावर टीका करताना बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केले. देशापेक्षा कोणीही मोठं नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना कपिल देव म्हणाले की, बीसीसीआयच्या निर्णयामुळं मला खूप आनंद झाला. कारण हा निर्णय देशांतर्गत क्रिकेटच्या हिताचा आहे. खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवं, ते देशासाठी चांगलं आहे. देशासाठी जे काही चांगलं होते त्याचं मला समाधान वाटतं. पण, होय काहींना यामुळे त्रास सहन करावा लागेल. होऊद्या... मात्र देशापेक्षा मोठा कोणीच नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.
बुधवारी बीसीसीआयनं वार्षिक करार यादी जाहीर केली. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना यातून डच्चू देण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट केलं की, इशान आणि श्रेयस यांच्या नावाचा विचार केला गेला नाही. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटकडं दुर्लक्ष केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई केली गेली असल्याचं बोललं जात आहे.
खेळाडूंची करार यादी पुढीलप्रमाणे -
- ग्रेड A+ - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
- ग्रेड A - आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.
- ग्रेड ब - सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
- ग्रेड क - रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.