लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेसाठी मधल्या फळीत आणि विशेष करुन चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी भक्कम फलंदाजाची आवश्यकता आहे, अशी चर्चा रंगतेय. पण, चौथे स्थान केवळ फलंदाजीचा क्रमांक आहे. या क्रमांकावर कोणीही खेळू शकतो. भारताकडे यासाठी अनेक पर्याय आहेत आणि त्यामुळेच निर्णय घेण्यात संघ व्यवस्थापनाचा गोंधळ उडतोय,' असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले.
सोमवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात गांगुलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय संघाच्या मधल्या फळीविषयी गांगुलीने म्हटले की, 'विश्वचषक केवळ चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या जोरावर जिंकता येणार नाही. मुख्य मुद्दा आहे की, या क्रमांकावर कोण खेळणार? कारण आपल्याकडे रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, लोकश राहुल असे अनेक पर्याय आहेत.' कासाग्रँड संस्थेच्या कार्यक्रमात गांगुली पुढे म्हणाला की, 'विराट कोहलीही चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. २०११ चा विश्वचषक आपण केवळ चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या जोरावर जिंकलो नाही. यामध्ये आघाडीच्या फळीत दमदार खेळलेल्या गौतम गंभीरचेही योगदान आहे. त्या अंतिम लढतीत खालच्या फळीत खेळणारा महेंद्रसिंग धोनी चौथ्या स्थानी आला होता. त्यामुळे, चौथा क्रमांक ही समस्याच नाही, तर प्रश्न आहे की या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार. कारण, आपल्याकडे यासाठी अनेक पर्याय आहेत.'
चौथ्या क्रमांकासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि निवडकर्ते यांना केवळ एक फलंदाज निश्चित करायचा असल्याचेही गांगुलीने सांगितले. भारताच्या गोलंदाजीबाबत गांगुली म्हणाला की, 'भारताचे गोलंदाजी आक्रमण शानदार आहे. जसप्रीत बुमराहने कमालीचे पुनरागमन केले असून आयर्लंडमधील त्याच्या वेगाचा आनंद घेतला. त्याचे पुनरागमन, सोबत मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासह आपल्याकडे अनेक लेगस्पिनर्सचाही पर्याय आहे. विश्वचषकासाठी मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणाऱ्या गोलंदाजांना मी पसंती देईन. यामध्ये युझवेंद्र चहलला नक्कीच स्थान असेल.'
'रहाणेला संधी नसेल'२०१५ सालच्या विश्वचषकात अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळला होता. त्याच्याविषयी गांगुली म्हणाला की, 'त्या गोष्टीला आता आठ वर्ष झाली आहेत आणि मला नाही वाटत रहाणेला आता संधी मिळेल.' यंदाच्या आयपीएलमध्ये रहाणेने आक्रमक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. या जोरावर त्याचे कसोटी संघात पुनरागमनही झाले.