मागील काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात जी चर्चा रंगली होती त्यावर आज शिक्कामोर्तब झाला असून, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाला ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे द्रविड आता नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते आता आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
द्रविड आपल्या फ्रँचायझीसोबत जोडले असल्याची माहिती राजस्थानच्या फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुपचे सीईओ जेक लश मॅक्रम यांनी द्रविड यांना गुलाबी जर्सी दिली. द्रविड यावेळी म्हणाले की, विश्वचषकानंतर, मला वाटते की माझ्यासाठी आणखी एक आव्हान स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे आणि ते करण्यासाठी रॉयल्स ही योग्य जागा आहे.
राहुल द्रविड मोठ्या कालावधीपर्यंत राजस्थानच्या संघाचा भाग राहिले आहेत. २०१३ मध्ये ते राजस्थानच्या संघाचे कर्णधार बनले. त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२० फायनल आणि आयपीएलच्या प्लेऑफपर्यंत संघाला नेले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. तेव्हा राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता. आताच्या घडीला राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कुमार संगकारा कार्यरत आहे. २०१५ पासून राहुल द्रविड बीसीसीआयशी जोडले गेले, त्यांनी भारताच्या अंडर-१९ आणि भारत अ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. मग एनसीएमध्ये अध्यक्षपदाचा कारभार सांभाळला. अखेर ऑक्टोबर २०२१ पासून त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली.