Join us  

एक वर्षापासून भारताची खराब खेळी सुरू आहे; रवी शास्त्रींनी राहुल द्रविडवर साधला निशाणा

एक वर्षापासून भारताची खराब खेळी सुरू आहे असे संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 5:17 PM

Open in App

नवी दिल्ली : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवून टी-20 विश्वचषक 2022चा किताब पटकावला. मात्र भारतीय संघाला या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले होते. खरं तर इंग्लिश संघानेच भारताला स्पर्धेतून बाहेर केले. आता विश्वचषकाची मोहिम संपताच भारतीय संघाच्या कामगिरीवर माजी खेळाडूंनी भाष्य करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागील वर्षी पदभार सोडल्यानंतर संघाची खराब कामगिरी सुरू असल्याचे म्हटले आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी नाव न घेता थेट राहुल द्रविड यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

पाकिस्तान-इंग्लंड यांचा अंतिम सामना संपल्यानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावर रवी शास्त्री, इरफान पठाण, क्रिस श्रीकांत हे भारताच्या पराभवाबद्दल चर्चा करत होते. यादरम्यान रवी शास्त्री म्हणाले, "मागील वर्षभरात भारतीय संघाची कामगिरी खालावली आहे. युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी होती. आम्ही वेगवान गोलंदाज विकसित करायला हवे होते. पण आपण हे केले नाही, इथे फक्त एकच गोलंदाज आला तो म्हणजे अर्शदीप सिंग." 

युजवेंद्र चहलला संधीही दिली नाही - इरफान पठाण या चर्चेदरम्यान इरफान पठाण म्हणाला की लेग-स्पिनरची ताकद ऑस्ट्रेलियामध्ये सर्वत्र दिसून आली. परंतु आम्ही आमचा सर्वोत्तम लेग-स्पिनर युजवेंद्र चहलला संधी देखील दिली नाही. अशा शब्दांत माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने युजवेंद्र चहलला संधी द्यायला हवी होती असे मत व्यक्त केले. खरं तर भारतीय संघाने विश्वचषकात एकूण 6 सामने खेळले. मात्र एकाही सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी मिळाली नाही. 

IPL मधील चागल्या खेळाडूंना संधी मिळायला हवी - शास्त्री "आयपीएल हे आमचे देशांतर्गत क्रिकेट आहे. तिथे चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळायला हवी होती मात्र तसे झाले नाही, असेही माजी प्रशिक्षक शास्त्रींनी म्हटले. भारत-इंग्लंड सामन्याबद्दल भाष्य करताना शास्त्रींनी म्हटले, "भारताने पहिल्या सहा षटकात 36 धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिल्या 6 षटकांत 60 धावा ठोकल्या. इथून सामन्यातील फरक स्पष्ट दिसतो. आमचा दृष्टिकोन चांगला नव्हता. त्याचा फटका संघाला सहन करावा लागला."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२राहुल द्रविडरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघइरफान पठाण
Open in App