भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या खासदार फंडातून दिल्ली सरकारला ५० लाखांची मदत करणाऱ्या गंभीरने आणखी एक कोटींची मदत जाहीर केली आहे. शिवाय त्याने एक महिन्याचा पगारही दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शनिवारी पंतप्रधान नागरिक सहकार्य आणि आपत्कालीन परिस्थिती निधीत 51 कोटींची मदत जाहीर केली. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही कोरोना व्हारयसशी मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मदतीला पुढाकार घेतला आहे. रहाणेनं महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीत 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
रहाणेच्या आधी सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांची मदत केली आहे. यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ दान केले आहेत. इरफान व युसूफ पठाण बंधुंनीही 4000 मास्कचे वाटप केले आहेत.
याआधी, गंभीरने आपल्या खासदार निधीतून दिल्लीतील सरकारी रुग्णालयास ५० लाख रुपयांचा निधी देऊ इच्छित असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, दिल्लीतील सरकारी रुग्णालयात कोरोनासंदर्भात रुग्णांसाठी, किंवा संशयित रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात.