T20 World Cup : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांमध्ये पराभव करत विश्वचषकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा हा शेवटचा सामना होता. तर या सामन्यासह कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० वर्ल्डकपमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयानंतर क्रिकेटपटू गौतम गंभीरने दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयासह संपूर्ण देश आनंदात असल्याचे गौतम गंभीरने म्हटलं आहे.
टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही संघाचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे सामनावीराचा पुरस्कार मिळताच कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अर्ध्या तासानंतर कर्णधार रोहित शर्मानेही आपला निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता हे दोघेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाहीत. या निर्णयावरुन माजी कर्णधार गौतम गंभीरने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
"संपूर्ण देश खूप आनंदी आहे. मला रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करायचे आहे. विश्वचषक जिंकून टी-२० कारकीर्द संपवण्यापेक्षा चांगले काय असू शकते. ते दोघेही महान खेळाडू आहेत आणि त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. मी त्यांना शुभेच्छा देतो की ते एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहील आणि ते देश आणि संघाच्या यशात योगदान देत राहतील, असे गौतम गंभीरने म्हटलं आहे.
विश्वचषक जिंकल्याबद्दल गौतम गंभीरने भारतीय संघाचे अभिनंदन केले होते. गंभीरने त्याच्या इंस्टाग्रामवर चॅम्पियन्स! अशी पोस्ट करत भारतीय संघाचा एक फोटो शेअर केला आहे.