वन डे विश्वचषकात यजमान भारतीय संघाला किताबापासून एक पाऊल दूर राहावे लागले. पण, प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरी गाठणाऱ्या भारताला किताबाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. विश्वचषकाच्या स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. राहुल द्रविड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपला. राहुल द्रविड करार वाढवण्यात इच्छुक नसल्याच्या बातम्याही समोर आल्या, त्यामुळे BCCI ने नव्या प्रशिक्षकासाठी शोधाशोध सुरू केली होती. पण, अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सपोर्ट स्टाफ यांच्या करारात वाढ केल्याची घोषणा केली अन् भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला.
राहुल द्रविड आगामी काळात देखील प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. याबद्दल बोलताना भारताचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरने आनंद व्यक्त केला. त्याने सांगितले की, ट्वेंटी-२० विश्वचषक तोंडावर असताना राहुल प्रशिक्षकपदी कायम राहिला ही चांगली बाब आहे... काही महिन्यांतच ट्वेंटी-२० विश्वचषक असल्यामुळे सपोर्ट स्टाफ बदलणे चुकीचे ठरले असते. तसेच द्रविडने याचा स्वीकार केला हे देखील चांगलं झालं.
प्रशिक्षकपदी कायम राहिल्यानंतर राहुल द्रविड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. आम्ही या संपूर्ण प्रवासात एकत्र येऊन चढ उतार पाहिले. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये स्थापित केलेल्या संस्कृतीचा मला खरोखर अभिमान आहे. आमच्या संघाकडे असलेली कौशल्ये आणि प्रतिभा अभूतपूर्व आहे. मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या दृष्टीला समर्थन दिल्याबद्दल आणि या काळात पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देतो. ही भूमिका स्वीकारल्यानंतर मला घरापासून बराच काळ दूर रहावे लागले आणि मी माझ्या कुटुंबाच्या त्याग आणि समर्थनाची मनापासून प्रशंसा करतो. त्यांची पडद्यामागची भूमिका मोलाची आहे", असे त्यांनी सांगितले.
लवकरच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार
वन डे विश्वचषकाची स्पर्धा पार पडल्यानंतर क्रिकेट विश्व ट्वेंटी-२० क्रिकेटकडे वळत चालले आहे. कारण आगामी काळात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक होणार आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त सहा महिने उरले आहेत. दरम्यान, आयपीएल सारखी मोठी स्पर्धा होणार आहे, ज्यामुळे तयारी मजबूत होण्यास खूप मदत होईल. अशातच द्रविड प्रशिक्षकपदी कायम राहिल्याने टीम इंडिया ट्वेंटी-२० विश्वचषक देखील गाजवेल अशी आशा बाळगूया.
Web Title: former cricketer Gautam Gambhir said, it is good that Rahul Dravid again as head coach of Team India ahead of t20 world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.