नवी दिल्ली : एकिकडे ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. तर भारत-पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये दोन्हीही देशाच्या क्रिकेट बोर्डावरून वाद रंगला आहे. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आगामी २०२३ चा आशिया चषक एका तटस्थ ठिकाणी होईल असेही त्यांनी म्हटले होते. यावरूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर पीसीबीने देखील लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयवर निशाणा साधला होता. तसेच आम्ही आगामी काळात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकू अशी धमकीच पीसीबीने दिली आहे.
दरम्यान, आता यावरून अनेक माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत. भारतीय खेळाडू बीसीसीआयचे समर्थन करत आहेत, तर पाकिस्तानचे माजी खेळाडू पीसीबीला ठोस निर्णय घेण्याचा सल्ला देत आहेत. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने म्हटले आहे की, भारताला पाकिस्तानात सुरक्षित वाटत नसल्यामुळे आम्ही तिथे खेळणार नाही.
हरभजन सिंगने पाकिस्तान बोर्डाला सुनावलं
हरभजन सिंगने आजतकशी संवाद साधताना म्हटले, "भारताला पाकिस्तानमध्ये सुरक्षित वाटत नाही. आम्हाला पाकिस्तानमध्ये खेळायचे पण नाही. पाकिस्तानशिवाय भारतीय क्रिकेटला काहीच नुकसान पोहचू शकत नाही. जर पाकिस्तानी संघाला एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात नसेल यायचं तर हरकत नाही." अशा शब्दांत हरभजन सिंगने पाकिस्तान बोर्डाचा चांगलाच समाचार घेतला.
खरं तर २०२३ मधील आशिया चषकाची स्पर्धा पाकिस्तानच्या धरतीवर खेळवली जाणार आहे. मात्र आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून पीसीबीने आगामी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
२०२३ मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा
- आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- आयसीसी १९ वर्षांखालील मुलींची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- आशिया चषक २०२३, पाकिस्तान
- आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Former cricketer Harbhajan Singh has said that the Indian team is not safe in Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.