Join us  

Champions trophy : पाकिस्तानमध्ये Team India ला खूप धोका आहे; हरभजनची संतप्त प्रतिक्रिया

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 2:26 PM

Open in App

Champions trophy 2025 : आताच्या घडीला क्रिकेट वर्तुळात सर्वात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५. पाकिस्तानात होणाऱ्या या स्पर्धेवरून भारत आणि पाकिस्तान असा वाद रंगत आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू भारतीय संघाला पाकिस्तानात आणण्यासाठी भावनिक साद घालत आहेत. युनूस खान, वसीम अक्रम, शाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक या पाकिस्तानी खेळाडूंनी याबद्दल भाष्य केले आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने संतप्त प्रतिक्रिया दिली. टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही असे भज्जीने स्पष्ट केले. (Champions Trophy 2025 IND VS PAK)

हरभजन सिंगने सांगितले की, भारतीय संघाने पाकिस्तानात का जावे? याचे उत्तर कोणीही द्यावे. कारण की तिथे सुरक्षेचा मुद्दा आहे. तिथे त्यांचेच लोक सुरक्षित नाहीत... टीम इंडियाला पाकिस्तानात खूप धोका आहे. तिकडे दररोज काही ना काही दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की, तिकडे जाणे योग्य आहे. बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला असून, टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही हे निश्चित आहे. भज्जी IANS शी बोलत होता. खरे तर २००२ आणि २०१३ मध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता. 

दरम्यान, पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होत असल्याचे दिसते. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा थरार रंगणार आहे. पण, बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे कळते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. खरे तर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव नेहमीच पाकिस्तानात जाणे टाळले आहे. शेवटच्या वेळी या दोन्ही देशांमध्ये २०१२-१३ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हापासून केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडतात. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघहरभजन सिंगबीसीसीआय