India vs Australia,1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही मालिका टीम इंडियासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल (WTC Final 2023) च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी तयार आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू कपिल देव यांनी या मालिकेत कोण सरस ठरणार यावर भाष्य केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारत २-१ अशा फरकाने जिंकेल, असा दावा कपिल देव यांनी केला आहे. तसेच शुभमन गिलचा संघात समावेश करत असल्यास त्याला ओपनिंग करण्याची संधी द्यायला हवी. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिलने ओपनिंग करायला हवी, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे. के.एल. राहुल फिट नसल्यास त्याला संघात जबरदस्ती सामील करुन घेऊ नका.
सुर्यकुमार यादव एक मोठा खेळाडू आहे. मात्र तो टी-ट्वेंटी खेळाडू आहे, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये घेण्यास घाई करु नका. सुर्यकुमारला रणजी क्रिकेट जास्त प्रमाणात खेळू द्या, असं कपिल देव यांनी सांगितले. विकेटकीपर ऋषभ पंत यांची गैहजेरी नक्कीच भारतीय संघाचं नुकसान आहे. त्याची अनुपस्थिती नक्कीच संघाला जाणवेल, असं कपिल देव म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेवर भारताचे वर्चस्व राहिले आहे. भारताने २०१७, २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका जिंकल्या आहेत. भारताने यंदाच्या चार सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाचा ४-० असा पराभव केला तर त्यांची टक्केवारी ६८.०६ अशी होईल. त्यानंतर WTC फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदाचा सामना होईल.
दरम्यान, भारतीय संघाने २०२३ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका यशस्वीपणे जिंकल्या. आता ९ फेब्रुवारीपासून भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. २०२०-२१च्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि त्याचा वचपा काढण्यासाठी कांगारू दाखल झाले आहेत. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियन संघाने फायनलमधील त्यांचे स्थान निश्चित केलं आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ आहे.
संपूर्ण वेळापत्रक ( Full Schedule)
पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Former Cricketer Kapil Dev has claimed that India will win the Test series against Australia by a margin of 2-1.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.