१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी आमंत्रित न केल्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयची धुलाई झाली. बीसीसीआयने बोलावलेच नाही. खरं तर १९८३ चा संपूर्ण संघ तिथे बोलवायला हवा होता असे मला वाटते. पण, आता सर्वकाही वेगळे असून काही लोक मागील गोष्टी विसरत आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली होती. आता वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाच्या पराभवावरही कपिल देव यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाला २४१ धावा करता आल्या आणि ट्रॅव्हिड हेडचे शतक व मार्नस लाबुशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हा सामना जिंकला. भारताच्या पराभवानंतर कपिल देव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कर्णधार रोहित शर्माचा भावनिक फोटो टाकला आणि लिहिले की- 'रोहित, तू तुझ्या कामात मास्टर आहेस. पुढे आणखी खूप सारं यश तुझी वाट पाहत आहे. मला माहिती आहे की फायनलमधला पराभव पचवणं तुझ्यासाठी कठीण आहे, परंतु खचून जाऊ नकोस. तरूणांना प्रेरित करत राहा. संपूर्ण भारत देश तुझ्यासोबत आहे.'
त्यात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना कपिल देव म्हणाले, माझ्यामते खेळाडूंनी पुढे चालत राहायला हवं, या पराभवाचं ओझं आयुष्यभर वाहू, असे तुम्ही बोलू शकत नाही. चाहत्यांवरही ते अवलंबून आहे. तुम्ही पुढच्या दिवसाची तयारी करायला हवी. जे घडून गेलं ते आपण बदलू शकत नाही, परंतु अथक मेहनत घेऊ शकतो. क्रीडापटू हेच करतात... भारतीय संघाचे अप्रतिम खेळ केला. हो, पण त्यांना अंतिम सामन्याचा अडथळा ओलांडता आला नाही. या चुकांमधून तुम्ही काय शिकता तो खरा स्पोर्ट्समन..