मुंबई: इंग्लंडमधील लीड्स येथे 1997 पासून भारतीय संघाने वनडे( एकदिवसीय) क्रिकेटला सुरुवात केल्यापासून आतापर्यत 229 खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताने एकूण 983 वनडे सामने खेळले असून 512 सामन्यात भारताचा विजय तर 421 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. तसेच 41 सामने अनिर्णयित आणि 9 सामने बरोबरीत झाले होते.
वनडे क्रिकेटच्या कारकीर्दीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंनी अनेक विक्रमाची गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वाधिक शतकांचा विक्रम माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर असून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यत एकूण 43 शतके लगावली आहे. मात्र काही अशे खेळाडू आहेत की ज्यांनी वनडे कारकीर्दीत फक्त एक शतकच केले आहे.
कपिल देव -
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव हरियाणाचे आहेत. भारताने इंग्लंडमधील १९८३चा विश्वचषक कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. क्वेटामध्ये कपिल देव यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते आणि 1994 साली त्यांनी निवृत्ती घेतली होती. कपिल देव यांनी एकूण 225 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून कपिल देव यांनी वनडे कारकीर्दीत फक्त एक शतक झळकावले आहे. कपिल देव यांनी 1983च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 175 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता.
सुनिल गावस्कर -
भारतीय क्रिकेटमध्ये सुनिल गावस्कर यांची महान फलंदाज म्हणून ओळख आहे. 1970- 80च्या दशकामध्ये कसोटी सामन्यामधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सुनिल गावस्कर यांना गणले जात होते. सुनिल गावस्करांनी भारतासाठी एकूण 108 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून 35 च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. मात्र वनडे क्रिकेटमध्ये लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांच्या नावावर फक्त एक शकतच आहे. सुनिल गावस्करांनी 1987 साली न्यूझीलंड विरुद्ध 222 धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले होते.
रॉबिन सिंग -
रॉबिन सिंग सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळत आहे. रॉबिन सिंग यांनी 1989 ते 2001 पर्यत एकूण 136 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून 25 च्या सरासरीने 2336 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना 69 विकेट्स देखील रॉबिन सिंग यांनी घेतल्या आहेत. वनडे सामन्यात रॉबिन सिंग यांच्या नावावर देखील एकमेव शतक आहे. 1997 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत एकूण 291 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजी करताना रॉबिन सिंग यांनी पहिले आणि एकमेव शतक झळकाविले होते. मात्र पाऊस आल्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता.
दिलीप वेंगसरकर -
दिलीप वेंगसरकर यांनी कसोटी क्रिकेटच्या कारकीर्दीत विविध विक्रम केले आहेत. सुनिल गावस्कर आणि गुंडप्पा विश्ननाथ यांच्यासोबत दिलीप वेंगसरकर भारतीय फलंदाजामधील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. विशेष म्हणजे वेंगसरकर यांना 'कर्नल' म्हणूनही ओळखले जात होते. वेंगसरकर यांनी 1976 पासून 1991 पर्यत 35 च्या सरासरीने एकूण 3508 धावा केल्या असून यामध्ये 23 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. दिलीप वेंगसरकर यांनी 1984 साली इंग्लंडविरुद्ध 105 धावा करत पहिले आणि एकमेव शतक झळकावले होते.
संजय मांजरेकर-
संजय मांजरेकर यांनी भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून काम केले आहे. संजय मांजरेकर यांनी 1988 पासून 1996 पर्यत 74 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून 33 च्या सरासरीने एकूण 1994 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. 1991 साली दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने 50 षटकात 4 बाद 287 धावा केल्या होत्या. यामध्ये संजय मांजरेकर यांनी आपले एकमेव शतक लगावले होते.