भारतीय क्रिकेट विश्वासाठी आजचा दिवस एक वाईट बातमी घेऊन आला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू, सिक्सर किंग सलीम दुर्रानी यांचे गुजरातच्या जामनगरमध्ये निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते.
सलीम दुर्रानी यांना कर्करोग झाला होता. रविवारी पहाटे त्यांच्या प्राणज्योत मालवली. अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेले दुर्रानी हे पहिले क्रिकेटर आहेत. त्यांनी भारतासाठी २९ कसोटी खेळल्या होत्या. यामध्ये त्यांनी 1202 रन्स बनविले होते. तसेच १ शतक आणि ७ अर्धशतकांचा यात समावेश होता. याचबरोबर त्यांनी ७५ विकेटही घेतले होते.
सलीम यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ मध्ये अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये झाला होता. परंतू ते ८ महिन्यांचे असतानाच त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्थायिक झाले होते. जेव्हा भारत-पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंबीय भारतात आले. त्यांचे आजोबा काबुलमध्ये फुटबॉलपटू होते.
दुर्रानी हे भारतीय संघाचे ऑलराऊंडर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात मुंबईत टेस्ट क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांच्या मागणीवरून षटकार खेचण्यात त्यांचा हातखंडा होता. दुर्रानी यांनी क्रिकेट जगतासह बॉलीवूडमध्येही काम केले होते. 1973 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 'चरित्र' नावाच्या सिनेमामध्ये तेव्हाची सर्वात सुंदर हिरोईन म्हणून ओळखली जाणारी परवीन बाबीसोबत काम केले होते.