Join us  

माजी क्रिकेटपटूंनी केली नेतृत्वकौशल्याची प्रशंसा; रहाणेवर स्तुतिसुमनांचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाने ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 12:23 AM

Open in App

मेलबोर्न : माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करीत असलेला कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणेने गोलंदाजीमध्ये केलेल्या बदलाची प्रशंसा केली. रहाणेच्या नेतृत्व कौशल्यामुळे शनिवारी पहिल्या दिवशी भारताने या लढतीत वर्चस्व गाजवले.

ऑस्ट्रेलियाने ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण रहाणेने गोलंदाजांना योग्य पद्धतीने रोटेट करीत यजमान संघाच्या फलंदाजावर दडपण कायम राखले. अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला लवकर गोलंदाजीला पाचारण करणे असो किंवा पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजला गोलंदाजी देणे असो, रहाणेचा प्रत्येक निर्णय अचूक ठरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत संपुष्टात आला. 

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाहने ट्विट केले,‘रहाणेने गोलंदाजीमध्ये योग्य बदल करताना क्षेत्ररक्षकांनाही योग्य जागी तैनात करण्याची चतुराई दाखविली. गोलंदाजांनीही अचूक मारा करीत कर्णधाराला साथ दिली. अश्विन, बुमराह, सिराज यांनी शानदार गोलंदाजी केली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत गुंडाळणे चांगली कामगिरी आहे. पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची दारोमदार आता फलंदाजावर आहे.’

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नही रहाणेच्या नेतृत्वशैलीमुले प्रभावित झाला. वॉर्नने ट्विट केले,‘एमसीजीमध्ये (मेलबोर्न क्रिकेट क्लब) क्रिकेटचा शानदार दिवस. प्रदीर्घ कालावधीनंतर अशी शानदार खेळपट्टी तयार केल्यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. अशा खेळपट्ट्या अधिक असायला हव्यात. भारतीय गोलंदाज आज शानदार होते आणि रहाणेने योग्य पद्धतीने नेतृत्व केले. भारतीय संघ रविवारी दिवसभर फलंदाजी करू शकतो.’

माजी दिग्गज भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांच्यासह कर्णधार रहाणेमुळे प्रभावित दिसला. लक्ष्मणने ट्विट केले,‘भारताने आज शानदार खेळ केला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावित केले. पदार्पण करीत असलेल्या दोन्ही खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दिसला. रहाणेने शानदार नेतृत्व केले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघाने ॲडिलेडमधील पराभवाच्या स्मृती पुसून टाकल्या आहेत.’

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया