पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या ढिसाळ कारभाराविरोधात माजी क्रिकेटपटू एकत्र आले आहेत. संघटनेच्या अनियमित कारभाराची माहिती १९ डिसेंबरपर्यंत न दिल्यास संघटनेविरोधात आंदोलन आणि उपोषण सुरू केले जाईल. तसेच पोलिसांकडेही तक्रार देण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटू आणि संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. माजी क्रिकेटपटू अनिल वाल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महाराष्ट्राचे अनेक माजी रणजीपटू आणि संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यात शंतनू सुगवेकर, माधव रानडे, दादा शेवाळे, रोहित थोरवे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, सुभाष रांजणे, प्रसाद कानडे, रँडाॅल्फ डॅनियल, राहुल कानडे, अभिषेक बोके, रणजित खिरीड, युवराज निंबाळकर आदींचा समावेश होता.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी मुळात चुकीची आहे. ‘बीसीसीआय’च्या सर्वोच्च न्यायालय नियुक्त समितीने त्यांची २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी झालेली निवडणूक रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा मताधिकारही काढून घेतला. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी ‘चेंज रिपोर्ट’ बदलून निवडणूक घटनेनुसार असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. बदललेल्या घटनेनुसार पदाधिकारी काम करत नसल्याचा आरोप वाल्हेकर यांनी केला आहे.
निवडणूक खरी असल्याचे सांगत महाराष्ट्र क्रिकेट संघटना क्लब ऑफ महाराष्ट्र, पूना क्लब आणि जळगाव यांना जाणूनबुजून बाजूला ठेवत आहेत. मात्र, धर्मादाय आयुक्तांसमोर त्यांचा सर्व युक्तिवाद रद्द ठरवण्यात आला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतल्या अनेक पदाधिकाऱ्यांना काम करण्याचा अधिकारही नाही. निवडणुकीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ९ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना संघटनेत पदाधिकारी बनवले गेले. कायद्याचे पूर्ण उल्लंघन करून त्यांनी नियामक सदस्यांनाही अडचणीत आणले असून फौजदारी कारवाई करणार आहे.
अनिल वाल्हेकर, माजी क्रिकेटपटू
Web Title: Former cricketers warn of agitation against MCA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.