इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जांयट्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या पर्वात प्रथमच CSK ने पहिल्या दोन लढती गमावल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली आहे आणि CSK ला पराभव पत्करावा लागल्याने फ्रँचायझीचे टेंशन वाढले आहे. अशात चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू व महेंद्रसिंग धोनीचा खास मित्र आयपीएल २०२२च्या मध्यंतरालाच निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.
आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेला आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत दिसणारा सुरेश रैना ( Suresh Raina) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.
२०२० मध्ये धोनीच्या निवृत्तीनंतर रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. पण, तो आयपीएल खेळला. Mr. IPL म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाला IPL 2022 च्या ऑक्शनमध्ये कोणत्याच संघाने ताफ्यात घेतले नाही. त्यामुळे यंदाच्या पर्वात तो मैदानावर दिसत नाही. ३५ वर्षीय रैनाला पुढील पर्वात तरी कोणती फ्रँचायझी आपल्या ताफ्यात घेईल, अशी शक्यताही फार कमी आहे. त्यामुळे तो लवकरच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.