IND vs ENG 4th Test: इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून त्यांनी कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडने आपला डाव साधला. पण त्यानंतर पुढील दोनही कसोटी सामने भारताने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर जिंकले. भारताच्या दमदार कमबॅकनंतर आता इंग्लंडच्या गोटात खळबळ माजली आहे. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या काही खेळाडूंवर आता टीकास्त्र डागले जात आहे. तसेच, त्यांच्या संघातील समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकने भारताविरुद्धच्या रांची कसोटीपूर्वी यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर ठेवण्याबाबत मत मांडले आहे. बेअरस्टो मालिकेतील आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्याला 6 डावात 0, 4, 25, 26, 37 आणि 10 धावा करता आल्या आहेत. त्याची सरासरीही 17 आहे. त्यामुळे बेअरस्टोला संघातून बाहेर काढणे संघाच्या फायद्यासाठीच आहे, असे मत कूकने मांडले आहे.
"जॉनी बेअरस्टोला संघातून बाहेर हाकला. मी हे त्याच्या आणि संघाच्या हितासाठी बोलतोय. कारण मला वाटतं की भारताचा हा दौरा आतापर्यंत त्याच्यासाठी कठीण होता. मी असे म्हणत नाही की तो पुन्हा कधीच कसोटी क्रिकेट खेळणार नाही, पण या मालिकेत अद्याप तो दमदार खेळी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याला संघातून बाहेर करणेच योग्य ठरेल," असे अतिशय स्पष्ट मत कूकने व्यक्त केले.
बेअरस्टोच्या जागी कोण?
बेअरस्टोच्या जागी प्लेइंग-11 मध्ये डॅन लॉरेन्सचा समावेश करण्याबाबतही कूकने सुचवले आहे. कूक म्हणाला की, जेव्हा तुम्ही धावा करत नसता तेव्हा काही गोलंदाज तुमच्यावर दबाव टाकून संघालाही दबावात आणतात. त्यामुळे मी डॅन लॉरेन्सला बेअरस्टोच्या जागी संधी देईन. मात्र, इंग्लंड संघ व्यवस्थापन बेअरस्टोसोबतच रांची कसोटीला जाईल, असे माजी कर्णधार मायकेल अथर्टन यांना वाटते. अथर्टनने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, या मालिकेसाठी बेअरस्टो महत्त्वाचा ठरला आहे. म्हणूनच या महत्त्वाच्या क्षणी आपण त्याला सोडू असे मला वाटत नाही.