नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने एक लांबलचक पत्रक लिहून याबाबत माहिती दिली. मला विश्वास आहे की या खेळापासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे, ज्याने मला अनेक वर्षांपासून खूप काही दिले आहे. अशा शब्दांत मॉर्गनने क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला. तसेच त्याने आपला प्रवास सांगताना म्हटले की, मिडलसेक्समध्ये सामील होण्यासाठी 2005 मध्ये इंग्लंडला जाण्यापासून, अगदी शेवटपर्यंत, SA20 मध्ये पार्ल रॉयल्सकडून खेळताना, मी प्रत्येक क्षणाची कदर केली आहे.
मॉर्गनने सहकाऱ्यांचे मानले आभार दरम्यान, मॉर्गनने त्याच्या कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आहेत. "प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार आले आहेत. परंतु माझे कुटुंब आणि मित्र या सर्व काळात माझ्या पाठीशी राहिले. मी माझी पत्नी, तारा, माझे कुटुंब आणि माझ्या जवळच्या मित्रांचे विशेष आभार मानू इच्छितो ज्यांनी मला बिनशर्त पाठिंबा दिला. तसेच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे, चाहत्यांचे आणि पडद्यामागील लोकांचे आभार मानू इच्छितो. कारण त्यांनी मला फक्त खेळाडूच बनवले नसून आजचा माणूस देखील बनवले आहे", अशा शब्दांत मॉर्गनने सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
भविष्यात समालोचक म्हणून काम करणार - मॉर्गन इयॉन मॉर्गनने भावनिक शब्दांत क्रिकेटला निरोप दिला असून भविष्यात नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. "क्रिकेटमुळे मी जगभर प्रवास करू शकलो आणि अविश्वसनीय लोकांना भेटू शकलो, ज्यांपैकी अनेकांशी मी आयुष्यभर मैत्री केली. जगभरातील फ्रॅंचायझी आणि संघांसाठी खेळताना मला अनेक आठवणी दिल्या आहेत, ज्या मी कायमस्वरूपी जपून ठेवीन. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून, मी माझ्या प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवू शकलो आहे आणि भविष्यात मी अधिकाधिक सक्षम होण्याची अपेक्षा करतो. तसेच आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी स्पर्धांमध्ये ब्रॉडकास्टर्ससोबत समालोचक म्हणून काम करेन. भविष्यात काय घडणार आहे याची मी मनापासून वाट पाहत आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"