Join us

IPL 2024: अनवाणी बॉलर अन् पुठ्ठ्याचा स्टम्प; इंग्लंडच्या दिग्गजाचं मुंबईत 'गल्ली क्रिकेट'

Michael Vaughan Video: इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मुंबईत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 17:26 IST

Open in App

IPL 2024 Update: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल... आयपीएल म्हणजे चाहत्यांसह माजी खेळाडूंसाठी देखील पर्वणीच. सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. देश विदेशातील माजी खेळाडू देखील विविध माध्यमांतून या स्पर्धेशी जोडले आहेत. अनेकांवर खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्याची जबाबदारी आहे, तर काही जण समालोचनाच्या माध्यमातून आयपीएलचा एक भाग आहेत. रिकी पॉन्टिग, लसिथ मलिंगा, सौरव गांगुली आणि कुमार संगकारा यांसारखे दिग्गज प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. (Michael Vaughan News)

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सातत्याने आयपीएलबद्दल व्यक्त होत असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट विश्वातील चालू घडामोडींवर भाष्य करत असतो. आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू झाल्यापासून वॉन या लीगमधील घडामोडींवर भाष्य करताना दिसला. आता इंग्लंडच्या या दिग्गजाने मुंबईत चिमुकल्यांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार वॉन देशाची आर्थिक राजधानी मुंबईत असून त्याने गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पाहायला मिळते की, वॉन लहानग्यांसोबत गल्ली क्रिकेट खेळत असून एक चिमुकला त्याला गोलंदाजी करत आहे. अनवाणी बॉलर अन् पुठ्ठ्याचा स्टम्प या व्हिडीओमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तसेच वाळूत रंगलेला हा क्रिकेटचा थरार सर्वांचे लक्ष वेधत आहे. व्हिडीओ शेअर करताना इंग्लिश खेळाडूने एक भन्नाट कॅप्शन दिले. मायकेल वॉनने भन्नाट कॅप्शन देत म्हटले की, मुंबईत लहानग्यांसोबत क्रिकेट खेळून आनंद वाटला... कसोटी सामन्यांमधील आणि येथील खेळपट्टी समान आहे. 

टॅग्स :इंग्लंडमुंबईआयपीएल २०२४ऑफ द फिल्ड