rcb ipl team 2023 । नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने काल मुंबई इंडियन्सला (MI vs RCB) पराभूत करून आयपीएल २०२३ मध्ये विजयी सलामी दिली. काल आयपीएलचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी अप्रतिम खेळ दाखवत सामना आपल्या नावावर केला. खरं तर आरसीबीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांसमोर कोणत्याच मुंबईच्या फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता.
दरम्यान, तिलक वर्माचा (८४) या खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीसमोर १७२ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विराट-डू प्लेसिसच्या जोडीने १७२ धावांचे आव्हान सहज गाठले आणि विजयी सलामी दिली. तिलक वर्माचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात आरसीबीच्या संघाला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. यावरूनच आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक मोठा दावा केला आहे.
मायकल वॉनने क्रिकबजशी संवाद साधताना फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचे तोंडभरून कौतुक केले. त्याने म्हटले, "मला वाटते की, बंगळुरूचा संघ एक दिवस नक्कीच आयपीएलचा किताब जिंकेल. त्यांच्याकडे एवढा अनुभव आहे आणि एवढी प्रतिभा आहे त्यामुळे ते हा कारनामा नक्कीच करू शकतात. रीस टोपलीच्या दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मात्र, तरीदेखील संघात अनुभवी खेळाडूंची मोठी फळी आहे. याशिवाय ते यंदा त्यांच्या घरच्या मैदानावर देखील सामने खेळत आहेत. मला खात्री आहे की, आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये नक्कीच जाईल आणि त्यानंतर काहीही होऊ शकते."
RCBची विजयी सलामीमुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. मुंबईला १७१ धावांवर रोखल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अप्रतिम कामगिरी करून विजय साकारला. विराटने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला. तर कर्णधार डू प्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर आरसीबीने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी आणि २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"