वन डे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरूद्ध १९० धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकन संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीत आले आहेत. या दोन्हीही संघांना उरलेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे आणि इतर संघांवर देखील अवलंबून राहावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने मोठी भविष्यवाणी केली.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "कोलकाता येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सेमीफायनल होईल असे कोणाला वाटते का?" यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने खूप मजेशीर उत्तर दिले आणि लिहिले की, या गोष्टींनी यापूर्वीही आमचे नुकसान केले आहे.
दक्षिण आफ्रिका विश्वचषक २०२३ च्या गुणतालिकेत सर्वोत्तम नेटरनरेट आणि १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर भारत १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर भारताने श्रीलंकेवर मात केली तर त्यांचा सलग सातवा विजय ठरेल आणि १४ गुणांसह उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. मात्र, पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. यासोबतच शेजाऱ्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
न्यूझीलंडच्या पराभवाची हॅटट्रिक न्यूझीलंडचे सध्या सात सामन्यांत ४ विजयांसह ८ गुण आहेत. न्यूझीलंडने इंग्लंड, नेदरलँड्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला पराभूत करून शानदार सुरुवात केली. पण, यानंतर भारताने किवींची लय खराब केली आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसमोरही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या चार सामन्यांत विजयाच्या रथावर स्वार झालेल्या किवी संघाने पराभवाची हॅटट्रिक मारली. त्यामुळे न्यूझीलंडला त्यांच्या आगामी सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे.