james anderson test wickets: सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. अलीकडेच आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटीतील ताज्या क्रमवारीत इंग्लिश संघाच्या जेम्स ॲंडरसनने पहिला क्रमांक पटकावला आहे. अशातच अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनबद्दलइंग्लंडचा माजी कर्णधार माईक अथर्टनने एक मोठे विधान केले आहे. अँडरसनने आपल्या कारकिर्दीत जितके बळी घेतले आहेत, तेवढे बळी आता कोणत्याच वेगवान गोलंदाजाला घेता येणार नाहीत, असा दावा अथर्टनने केला आहे.
जेम्स ॲंडरसनबद्दल भाष्य करायचे झाले तर, तो सध्या त्याचा 179 वा कसोटी सामना खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत 25.94 च्या सरासरीने 682 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने कारकिर्दीत 32 वेळा 5 बळी घेण्याची किमया साधली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात मुथय्या मुरलीधरन अव्वल तर शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जेम्स अँडरसन पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्याचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड 571 बळींसह दुसऱ्या तर ग्लेन मॅकग्रा 563 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.
ॲंडरसनएवढे बळी कोणीच घेऊ शकत नाही - ॲंडरसन 'द टाइम्स'साठी लिहलेल्या लेखात माईक अथर्टनने मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले, "आता कसोटी क्रिकेटमध्ये कोणताही वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनपेक्षा जास्त बळी घेऊ शकणार नाही. खरं तर विक्रम मोडण्यासाठी बनवले जातात आणि मोठे विक्रमही बनवले जातात पण मला विश्वास आहे की अँडरसनचा विक्रम कधीच कोणीच मोडणार नाही. जोपर्यंत कसोटी क्रिकेट खेळले जाईल, तोपर्यंत जेम्स अँडरसनचा विक्रम कायम राहील. स्टुअर्ट ब्रॉड अँडरसनच्या मागे आहे, ज्याने आतापर्यंत 571 बळी घेतले आहेत परंतु आता तो अधिक कसोटी सामने खेळू शकणार नाही. ब्रॉडनंतर टीम साऊथी आहे ज्याने 355 बळी घेतले आहेत पण तो खूप मागे आहे. वयाच्या 40 व्या वर्षीही अशी गोलंदाजी करणे अप्रतिम आहे. क्वचितच कोणताही वेगवान गोलंदाज आता इतके कसोटी सामने खेळू शकेल."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"