IND vs ENG Test: भारतीय संघ नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून आला. ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. आता भारतीय संघाची २५ जानेवारीपासून इंग्लंड विरूद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा असे चार फिरकीपटू संघात घेण्यात आले आहेत. असे असतानाच, इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने भारतीय संघाला दिलेल्या एका सल्ल्यात इशारा लपला असल्याची चर्चा आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने भारताला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार करू नका, असा सल्ला दिला आहे. नासिर हुसेनने दिलेला सल्ला नीट समजून घेतला तर यात असा इशारा लपला आहे की अशा परिस्थितीत इंग्लिश संघाचे फिरकीपटूही प्रभावी ठरू शकतात. इंग्लंडने भारत दौऱ्यासाठी त्यांच्या संघात चार फिरकीपटूंचा समावेश केला आहे, ज्यात जॅक लीच, रेहान अहमद, टॉम हार्टले आणि शोएब बशीर यांचा समावेश आहे. यातील काहींना अद्याप आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. पण फिरकीपटूंचा भरणा असलेल्या इंग्लंडच्या संघाकडूनही अशा पिचवर तगडी टक्कर पाहायला मिळू शकते, अशी चर्चा आहे.
"मला विश्वास आहे की भारत चांगली खेळपट्टी तयार करेल. फिरकीला पोषक असलेली खेळपट्टी तयार करण्यात त्यांनी सर्व काही खर्ची घालू नये. कारण ते त्यांच्या फिरकीपटू आणि फलंदाज दोघांना समान फायदा मिळवून देईल. जर त्यांनी भरपूर फिरकी घेणारी खेळपट्टी तयार केली तर ते लॉटरीसारखे होऊ शकते आणि यामुळे खेळात इंग्लंडच्या फिरकीपटूंची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. बॅझबॉल (इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील आक्रमक रणनीती) ज्या पद्धतीने काम करते, ते पाहता त्यांना सहजासहजी यात अडकवता येणे शक्य नाही", असे नासिर हुसैन म्हणाला.