इंग्लंडची माजी क्रिकेटर सारा टेलरने ( Sarah Taylor) बुधवारी तिची जोडीदार गर्भवती असल्याचे जाहीर केले. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या इंग्लंडच्या यष्टिरक्षक-फलंदाजाने तिच्या ट्विटर हँडलवर ही बातमी जाहीर केली. तिने तिच्या जोडीदारासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि खुलासा केला की "हा प्रवास सोपा नव्हता पण तिचा एक भाग बनून मी आनंदी आहे.
सारा टेलरने ट्विट केले की, “आई बनणे हे माझ्या जोडीदाराचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. हा प्रवास सोपा नव्हता, पण डायनाने हार मानली नाही. मला माहित आहे की ती सर्वोत्कृष्ट आई बनेल आणि मी त्याचा एक भाग बनून खूप आनंदी आहे. १९ आठवड्यांनंतर आयुष्य खूप वेगळं होईल!”
महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक टेलरने सप्टेंबर २०१९ मध्ये डिप्रेशनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे टेलरने मार्च २०१६ मध्ये क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती, परंतु नंतर ती वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परतली. २०१७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पुनरागमन करताना तिने ४९.५० च्या सरासरीने ३९६ धावा केल्या. टेलरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळी सामन्यात १४७ आणि उपांत्य फेरीत ५४ आणि अंतिम फेरीत भारताविरुद्ध ४५ धावा केल्या.
टेलर ही ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडची दुसरी सर्वाधिक धावा करणारी आणि एकूण सातवी खेळाडू आहे. तिन ९० सामन्यांमध्ये २१७७ धावा केल्या आहेत आणि ज्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तिन १० कसोटीत ३०० धावा केल्या आहेत.