भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने पाकिस्तानींच्या मानसिकतेवर जोरदार हल्लाबोल केला. भारताच्या युवा संघाला रविवारी १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. उदय सरहान याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला हार पत्करावी लागल्याने पाकिस्तानातील काही लोकांनी आनंद व्यक्त केला. हे पाहून इरफान पठाण खवळला आणि त्याने शेजाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली.
हॅरी डिक्सन ( ४२), कर्णधार ह्युज वैबगेन ( ४८), हरजस सिंग ( ५५) व ऑलिव्हर पिक ( ४६*) यांच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाला ७ बाद २५३ धावांपर्यंत मजर मारून दिली. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ १७४ धावांत तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाने ७९ धावांनी सामना जिंकला. यानंतर पाकिस्तानी आनंदीत झाले, त्यावर इरफान पठाणने ट्विट केले की, स्वतः फायनलमध्ये पोहोचू शकले नाहीत, याचा विचार करण्याचं सोडून, शेजारी भारतीय संघाच्या पराभवाचा आनंद व्यक्त करत आहेत. ही त्यांची मानसिकता देशातील नकारात्मकता दर्शवते.
पाकिस्तानला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून १ विकेटने पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानचा संघ १७९ धावांवरच मर्यादित राहिला. त्यांनी अवघ्या ७९ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. अझान अवैस ( ५२ ) आणि अराफत मिन्हास ( ५२) यांनी अर्धशतके झळकावून पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने सर्वाधिक ६ बळी घेतले. १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ९ फलंदाज १६४ धावांवर गमावले होते.
राफ मॅकमिलन व कॅलम व्हिडएर मैदानावर उभे होते. पाकिस्तानला केवळ एक विकेट हवी होती. १६ चेंडूंत ११ धावा हव्या असताना मोहम्मद झीशानच्या बाऊन्सवर ऑसींना चौकार मिळाला. उबैद शाहच्या ४९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मॅकमिलनसाठी पायचीतची जोरदार अपील झाली, परंतु अम्पायरने नकार दिला. सोबतच अम्पायरने गोलंदाजाला संयम बाळगण्याच्या सूचना केल्या. ६ चेंडूत ३ धावा हव्या असताना चौकार मिळाला आणि ऑस्ट्रेलियाने १ विकेटने ही मॅच जिंकून फायनलमध्ये धडक दिली