Join us  

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील

जूनमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 7:20 PM

Open in App

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) हा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत BCCI च्या लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. जूनमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपतोय आणि त्यामुळेच बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे.  

गंभीर सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक आहे आणि ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून या माजी खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे आणि KKR ने त्यांची IPL 2024 मोहीम पूर्ण केल्यानंतर पुढील चर्चा अपेक्षित आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ मे ही आहे.

द्रविडने BCCI ला पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास इच्छुक नसल्याचे कळवल्याचे समजते आहे.  ४२ वर्षीय गंभीरला आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव नाही, परंतु त्याने दोन आयपीएल फ्रँचायझींमध्ये कोचिंग स्टाफची जबाबदारी सांभाळली आहे. आयपीएल २०२२ व २०२३ मध्ये तो लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता आणि दोन्ही हंगामात संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. २०२४ मध्ये तो KKRच्या ताफ्यात आला आणि या संघाने क्वालिफायर १मध्ये स्थान पटकावले आहे.

२००७ च्या भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयी आणि २०११च्या वन डे वर्ल्ड कप विजयी संघाचा तो सदस्य होता. त्याने २०११ ते २०१७ या कालावधीत KKR चे नेतृत्व केले आणि पाच वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश करताना २०१२ व २०१४ मध्ये त्यांनी बाजी मारली. २०१४च्या चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० च्या अंतिम फेरीतही त्याच्या नेतृत्वाखाली KKR ने धडक दिली होती.  

गेल्या आठवड्यात BCCI ने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागणारी जाहिरात पोस्ट केली होती. त्यांनी यात जुलै २०२४ ते डिसेंबर २०२७ या कालावधीसाठी मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ ठरवला आहे. २०२१ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर द्रविडने भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू केला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २०२३ च्या वन डे वर्ल्ड कपनंतर त्याचा कार्यकाळ संपणार होता, परंतु त्याने जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या समाप्तीपर्यंत मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली. 

टॅग्स :गौतम गंभीरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघराहुल द्रविडकोलकाता नाईट रायडर्स