India vs Sri Lanka, Virat Kohli 100th Test : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणखी एका विक्रमाच्या पंक्तित जाऊन बसणार आहे. भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा तो १२वा खेळाडू बनणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात मोहाली येथे ४ मार्चपासून सुरू होणारी कसोटी ही विराटसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे BCCIला उशीरा का होईना शहाणपण सुचले आणि ५० टक्के प्रेक्षकक्षमतेला त्यांनी मान्यता दिली. BCCचे अध्यक्ष व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानंही विराटला १००व्या कसोटीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गांगुलीनेही ११३ कसोटी सामने खेळले आहेत आणि विराटचे या पंक्तित त्याने स्वागत केले. तो म्हणाला,''हा पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला खूप चांगले खेळाडू असणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटमध्ये फार कमी लोकांनी १०० कसोटी सामने खेळले आहेत. तो एक विलक्षण लँडमार्क आहे. विराट हा महान खेळाडू आहे आणि तो यासाठी पात्र आहे.''
२००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्याने ९९ कसोटीत ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. कसोटीत त्याच्या नावावर १०० झेल आहेत, शिवाय २४ षटकात व ८९६ चौकारही आहेत. ''मी त्याच्याबरोबर खेळलो नाही. पण मी नेहमीच त्याचा खेळ फॉलो केला आहे. मी नेहमीच त्याच्या क्रिकेटचा मागोवा घेतला आहे. त्याची कारकीर्द कधीपासून सुरू झाली आणि काही वर्षांनी त्याला वेगळे वळण कसे मिळाले, हे मी सर्व पाहिले आहे. त्याचे तंत्र, त्याची सकारात्मकता, त्याचे फूटवर्क, त्याचा तोल… मला हे सर्व आवडते,''असेही गांगुली म्हणाला.
''२०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर विराट चाचपडताना दिसला होता. मी त्यावेळेस समालोचकाच्या भूमिकेत होतो आणि त्यामुळे ती मालिका पाहिली होती. त्यानंरच्या पाच वर्षांत त्याने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. हे फार क्वचितच होतं. राहुल द्रविडच्या बाबतीत हे मी २००२ ते २००५ या कालावधीत पाहिले होते. दिग्गज खेळाडूंच्या कारकीर्दित असा काळ येतो. सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दित असे बरेच टप्पे तुम्ही पाहिले असतील,''असेही गांगुलीने हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना सांगितले.
त्यामुळे विराट कोहलीचे शतक लवकरच पाहायला मिळेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. तो म्हणाला, त्यासाठी काही समायोजन गरजेचे आहे, परंतु ते अवघड आहे असे मला वाटत नाही. तो पुनरागमन करेल आणि शतक झळकावेल. दोन वर्षांपासून त्याला शतक करता आलेले नाही, याची चर्चा सुरू आहे. तो चांगला खेळाडू आहे. त्याचाही हा वाईट काळ निघून जाईल. शतक कसे करायचे हे त्याला माहित्येय, अन्यथा त्याने ७० शतकं केली नसती.''