icc odi world cup final match | अहमदाबाद : भारताला पहिला विश्वचषक जिंकूवून देणारे कर्णधार कपिल देव अनेकांसाठी प्रेरणा आहेत. १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक उंचावला होता. यंदाच्या वन डे विश्वचषकात भारताने फायनलमध्ये मजल मारताच अनेक जाणकारांसह माजी खेळाडू यजमान संघ विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत आहे. आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. अशातच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एक मोठे विधान केले. २०२३ च्या फायनलसाठी मला आमंत्रित केले नसल्याचा दावा त्यांनी केला.
कपिल देव यांची खदखद एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देव यांनी खदखद व्यक्त केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितले की, तुम्ही मला बोलावले आणि मी इथे आलो. त्यांनी (बीसीसीआय) मला बोलावलेच नाही. खरं तर १९८३ चा संपूर्ण संघ तिथे बोलवायला हवा होता असे मला वाटते. पण, आता सर्वकाही वेगळे असून काही लोक मागील गोष्टी विसरत आहेत.
कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने १९८३ मध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजला चीतपट करून विश्वचषक उंचावला होता. कपिल देव अहमदाबाद येथे होत असलेल्या फायलचे साक्षीदार होत नसले तरी अनेक विश्वचषक विजेत्या कर्णधारांची उपस्थिती आहे. माजी खेळाडूंशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींची उपस्थिती लक्षणीय आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासह फायनलचे साक्षीदार झाले आहेत.
दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेजलवुड.