माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) टीम इंडियाच्या निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. २०२३चा वन डे वर्ल्ड कप यावेळी भारतात होणार आहे आणि टीम इंडियाला हे विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी आहे. भारतीय संघाला २०११ पासून वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही, तर २०१३ नंतर भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताने दोन वेळा धडक मारली, परंतु उपविजेतेपदावरच त्यांना समाधानी रहावे लागले. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होतोय आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाजी मारेल असा अनेकांना विश्वास आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत हा वर्ल्ड कप होणार आहे.
यासाठी संघाला परफेक्ट कॉम्बिनेशन राखायला हवे. त्यासाठी निवड समितीने यशस्वी जैस्वालला कोणत्याही परिस्थितीत वर्ल्ड कप संघात समावेश करावे, असा सल्ला सौरव गांगुलीने दिला आहे. जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून आपले नाव गाजवले. सौरव गांगुलीने १९९६ साली लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धही अशी कामगिरी केली होती. अशा स्थितीत गांगुलीने टेलिग्राफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, पदार्पणातच शतक करणे ही मोठी गोष्ट आहे. मी पण हे केले आहे. मला माहित आहे की ते किती खास आहे. जैस्वाल याचे तंत्र उत्कृष्ट आहे. डावखुरा फलंदाज हा संघासाठी नेहमीच फायदेशीर असतो. अशा स्थितीत तो वर्ल्ड कप संघात असणे आवश्यक आहे.''
ईडन गार्डन्स मैदानाची तयारी पाहण्यासाठी गांगुली कोलकाता येथे पोहोचला होता. या स्टेडियममध्ये वर्ल्ड कप सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आणखी एक हाय व्होल्टेज सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.