Sourav Ganguly prediction on 2023 World Cup | नवी दिल्ली : आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. याबाबत बोलताना भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीयआचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक मोठा दावा केला आहे. तसेच कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत देखील आमनेसामने असतील असे त्यांनी म्हटले आहे.
Revsportz शी बोलताना क्रिकेटच्या दादांनी आगामी विश्वचषकाबद्दल भाष्य केले. "ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत हे संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. पण आपण न्यूझीलंडला देखील कमी लेखू शकत नाही. त्याचबरोबर मला वाटते की, पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे उपांत्य फेरी गाठू शकतील असे पाच संघ मी सांगेन. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन येथे झाला तर बरे होईल. आम्हाला कोलकात्यात भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीचा सामना पाहायचा आहे, त्यामुळे तो खूपच रोमांचक असेल", असे गांगुलींनी सांगितले.
भारतात रंगणार थरार
दरम्यान, १० वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू
Web Title: Former India captain Sourav Ganguly has claimed that India, England, Australia, Pakistan and New Zealand can reach five semi-finals in the ICC Men's Cricket World Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.