ICC ODI World Cup 2023 : आगामी वन डे विश्वचषकाबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एक मोठं विधान केलं आहे. भारताचा मिस्टर ३६० वन डे क्रिकेटसाठी अद्याप परिपूर्ण नसल्याचे त्यांनी सांगितले. सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० क्रिकेटमधला जगातील नंबर वन फलंदाज आहे, पण जर आपण वन डे क्रिकेटबद्दल भाष्य केले तर, अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला खास कामगिरी करता आली. पण त्यानंतर झालेल्या तिसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारतीय निवडकर्त्यांनी आगामी वन डे विश्वचषक २०२३ साठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमारला स्थान मिळाले आहे. मात्र, सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू नये असे म्हटले आहे. सुनील गावस्कर म्हणाले की, सूर्यकुमार यादवने वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत असे काहीही केलेले नाही की त्याला आगामी विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकावर संधी दिली जावी. सूर्यकुमार सध्या वन डेमध्ये जी कामगिरी करत आहे, ते चौथ्या क्रमांकावर खेळताना इशान किशन आणि हार्दिक पांड्याही करू शकतात.
गावस्कराचं स्पष्ट मतNDTV शी बोलताना गावस्करांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "सूर्यकुमारने वन डे क्रिकेटमध्ये अद्याप कोणतीही मोठी कामगिरी केलेली नाही. तो फक्त शेवटच्या १५-२० षटकांमध्ये फलंदाजी करतो, जिथे तो त्याच्या ट्वेंटी-२० मधील क्षमतेचा वापर करतो, जे महत्त्वाचे आहेच. पण, हार्दिक पांड्या, इशान किशन आणि लोकेश राहुल हे देखील सूर्यासारखी खेळी करू शकतात. त्यामुळे श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार आहे. सूर्यकुमारला आणखी थोडी वाट पहावी लागेल आणि जर त्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली तर त्याला शतक झळकावे लागेल आणि आपणही शतके ठोकू शकतो हे दाखवावे लागेल", असेही गावस्करांनी नमूद केले.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.