Join us  

'निघून जा' या स्लेजिंगने संयम सुटला, अन्...; सुनील गावसकरांच्या 'त्या' वॉकआऊटमागची गोष्ट 

गावस्कर यांनी पंचाला नाराजी कळण्यासाठी आपली बॅट पॅडवरही आदळली होती. वृत्तानुसार गावस्कर खेळपट्टी सोडत असताना लिलीने काही तरी टिप्पणी केली होती आणि या भारतीय फलंदाजाने परत येत सहकारी सलामीवीर चेतन चौहान यांनाही मैदान सोडण्याचे निर्देश दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 12:12 PM

Open in App

माझ्याविरुद्धच्या पायचितच्या निर्णयामुळे नव्हे तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या 'निघून जा' या टिप्पणीमुळे संयम गमावला आणि आपण आपल्या सहकारी फलंदाजासह मैदानाबाहेर गेलो होतो, असे सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी 1981च्या मेलबर्न कसोटीदरम्यान वादग्रस्त वॉकआऊट प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले.

ही मालिका पंचांच्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. डेनिस लिलीच्या लेग कटरवर गावस्कर यांना पंच रेक्स वाइटहेडने पायचित बाद दिले होते. वाईटहेड यांचा पंच म्हणून केवळ तिसरा कसोटी बळी होता. गावस्कर यांना वाटले की, चेंडू त्यांच्या बॅटला लागला आहे. त्यांनी निर्णयाला विरोध केला आणि खेळपट्टीवर ठाम राहिले. गावस्कर आता सेव्हन क्रिकेटसोबत बोलताना म्हणाले,''पायचितच्या निर्णयावर मी नाराज होतो, हा चुकीचा संदेश आहे. तो निराशाजनक निर्णय होता; पण मी वॉकआऊट यासाठी केले कारण ज्यावेळी मी पॅव्हेलियनकडे परतत होतो त्यावेळी चेतनजवळून जात असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्लेजिंग केले. त्यांनी मला निघून जा असे म्हटले. त्यावेळी मी परत गेलो आणि चेतनलाही सोबत येण्यास सांगितले.''

गावस्कर यांनी पंचाला नाराजी कळण्यासाठी आपली बॅट पॅडवरही आदळली होती. वृत्तानुसार गावस्कर खेळपट्टी सोडत असताना लिलीने काही तरी टिप्पणी केली होती आणि या भारतीय फलंदाजाने परत येत सहकारी सलामीवीर चेतन चौहान यांनाही मैदान सोडण्याचे निर्देश दिले. चौहान यांनी गावस्कर यांचे निर्देश मानले; पण सीमारेषेवर संघाचे व्यवस्थापक शाहिद दुर्रानी व सहायक व्यवस्थापक फलंदाजांना भेटले आणि त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर चौहान खेळपट्टीवर परतले. 

''चेंडू माझ्या बॅटला लागून पॅडवर आदळला होता. तुम्ही फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकाला बघू शकता. त्याने कुठले अपील केल नव्हते. तो आपल्या स्थानावरून हललासुद्ध नव्हता. डेनिस मला म्हणाला की, मी तुझ्या पॅटवर चेंडू मारला तरी मी चेंडू हिट केल्याचे सांगत होतो,'' असेही गावस्करांनी सांगितले. 

 

टॅग्स :सुनील गावसकरभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया