भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी ३३ वर्षांपूर्वी मुंबईत क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी घेतलेली जमीन अखेर महाराष्ट्र सरकारला परत केली, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी गेल्या वर्षी त्या जागेचा वापर न होत असल्याने नाराजी व्यक्त केली होती. वांद्रे येथे ३३ वर्षांपूर्वी गावस्कर यांना ही जमीन क्रिकेट अकादमीसाठी दिली गेली होती, परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही.
आठ महिने यासंदर्भात गावस्कर व म्हाडा यांच्यात चर्चा झाली आणि अखेरीत गावस्करांनी ही जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. तसेच मागच्या वर्षी वांद्रे येथे देण्यात आलेल्या जमिनीवर क्रिकेट अकादमी स्थापन करणार नसल्याचेही गावस्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळवल्याचे आव्हान यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी गावस्कर व महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची क्रिकेट अकादमी संदर्भात भेट घेतली होती, परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही.
''होय आमच्या ट्रस्टने ती जागा राज्य सरकारला परत केली आहे. माझा सध्या कामाचा व्याप आणि अन्य सामाजिक काम पाहता मला क्रिकेट अकादमीच्या स्वप्नाला न्याय देता येणार नाही. पण, जर म्हाडाला त्या जमिनीवर अकादमी स्थापन करायची असेल आणि त्यांना काही मार्गदर्शन लागेल, तर मी नक्की मदत करीन. मला आनंदच होईल,''असे गावस्कर यांनी TOIला सांगितले.