Indian Cricket Team: स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानकडे ( Sarfaraz Khan) भारतीय संघाची निवड समिती दुलर्क्ष करत असल्याने महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) हे संतापले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानची निवड होणे अपेक्षित होते, परंतु BCCI ने जाहीर केलेल्या संघात मुंबईच्या खेळाडूचे नाव नव्हते. त्यानंतरही सर्फराजने रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीविरुद्ध शतकी खेळी करून निवड समितीला सडेतोड उत्तर दिले. त्यात आता गावस्करांनी निवड समितीला खरी खोटी सुनावली.
इंडियन टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले की, जर तुम्हाला संघात स्लीम ट्रीम ( सतपातळ) खेळाडूच हवे आहेत, तर मग फॅन शो मध्ये जा, तिथे तुम्हाला मॉडल मिळतील. त्यांच्या हातात बॅटबॉल द्या अन् खेळा... अशा प्रकारे क्रिकेट चालत नाही. तुमच्याकडे सर्व प्रकारच्या शेप व साईजमधले क्रिकेटपटू आहेत. खेळाडूंची निवड त्याच्या शरिरावरून नव्हे तर मैदानातील कामगिरीवरून व्हायला हवी.
सर्फराजने स्थानिक क्रिकेटमध्ये २०२२ पासून सलग तिसऱ्या वर्षात दमदार कामगिरी केली आहे. यात त्याने १२ शतकांसह २४४१ धावा केल्या आहेत. अशात त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड होणे अपेक्षित होते. गावस्करांनी निवड समितीच्या निर्णयावर टीका केली, तुम्ही अनफिट असाल तर शतक झळकावू शकत नाही. क्रिकेटमध्ये फिटनेस महत्त्वाचा आहे. त्यामुळे Yo Yo टेस्ट घेत असाल तर मला काहीच अडचण नाही. पण, फक्त तोच मापदंड असता कामा नये. तुम्हाला स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीही लक्षात घ्यायला हवं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर किमान ५० डावांत सर्वाधिक सरासरी असलेला सर्फराज हा दुसरा फलंदाज आहे. ब्रॅडमन यांची सरासरी १०५.४ इतकी आहे, तर सर्फराजने ५३ सामन्यांत ८२.६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विजय मर्चंट आहेत. सर्फराजने एकूण ५३ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ अर्धशतकं व १३ शतकांसह ३४८० धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"