T20 World Cup 2022 : ट्वेंटी-२० स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि दीपक चहर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मोहम्मद शमी फिटनेस टेस्ट पास करून ब्रिस्बनला पोहोचला आहे आणि आता तरी सर्वकाही सुरळीत आहे, असेच दिसतेय. आज भारतीय संघ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सराव सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा अँड कंपनीकडून भारतीयांना वर्ल्ड कप विजयाच्या आशा आहेत. २००७ नंतर भारताला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही आणि १५ वर्षांनंतर हा दुष्काळ संपेल असे अनेकांना वाटतेय. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shashtri) यांनीही मोठं विधान केलं आहे.
रोहित, विराट, लोकेश प्रॅक्टीस करणार कसे? नेट बॉलर्स अजूनही भारतात अडकले; जाणून घ्या कारण
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या फलंदाजीची फळी मजबूत असल्याचे मत शास्त्रींनी व्यक्त केले. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शास्त्री हे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी होते आणि भारताला पाचपैकी ३ विजय मिळवता आले होते. इतकेच नाही तर त्यांना बाद फेरीतही प्रवेश मिळवता आला नव्हता. मात्र, त्यानंतर मागील १२ महिन्यांत भारतीय संघांनी सातत्याने ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या आहेत. सूर्यकुमार यादव व फिनिशर दिनेश कार्तिक हे दोन हिरे भारताला मिळाले आहेत. कार्तिकचे पुनरागमन सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. त्यामुळेच जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती असली तरी फलंदाज भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत सहज घेऊन जातील, असे शास्त्रींना वाटते.
''मागील सहा वर्ष मी या सिस्टमचा सदस्य होतो. आधी प्रशिक्षक म्हणून आणि आता सिस्टमबाहेरून संघाची कामगिरी पाहतोय. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारतीय संघात फलंदाजांची अशी तगडी फौज मी पाहिली नव्हती. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर, हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आणि रिषभ पंत किंव दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर असल्याने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना त्यांच्या बिनधास्त शैलित खेळण्याचा आत्मविश्वास मिळतोय,''असे ते म्हणाले.
''फक्त क्षेत्ररक्षणात भारतीय संघाला कामगिरी सुधारण्याची गरज आहे. त्यांना आणखी अथक परिश्रम घ्यावे लागतील आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापासूनच मैदानावर अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण करावे लागेल. १५-२० धावा त्यांच्याकडून ज्या रोखल्या जातील त्याने सामन्यात बराच फरक पडणार आहे,''असे मत त्यांनी व्यक्त केले. शास्त्रींनी आशिया चषक स्पर्धेतील विजेत्या श्रीलंका संघाचे यावेळी उदाहरण दिले. त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये क्षेत्ररक्षणात अफलातून कामगिरी केल्याचेही शास्त्री म्हणाले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांचेही क्षेत्ररक्षण दमदार आहे आणि भारताला त्यांच्या तोडीची कामगिरी करावी लागेल, असे मत माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले.
- २३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- २७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी
- ३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ
- २ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड
- ६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- १३ नोव्हेंबरला अंतिम सामना
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"