आंध्रप्रदेश : भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेली दोन वर्ष तो कॉर्पोरेट क्रिकेट खेळत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान स्थानिक क्रीडा चॅनेलसाठी समालोचन केल्यानंतरच त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याहे मंगळवारी याची घोषणा केली. त्यानं आंध्र प्रदेश संघाकडून 121 प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना त्यानं 40.93च्या सरासरीनं 17 शतकं आणि 30 अर्धशतकांसह 7081 धावा केल्या आहेत.
37 वर्षीय वेणुगोपाळ आता तेलुगू समालोचक म्हणून काम पाहणार आहे.''आंध्र प्रदेश संघाचा माजी कर्णधार आणि भारताचा माजी फलंदाज वेणुगोपाळ राव यानं निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानं भारताकडून 16 वन डे सामने आणि आयपीएलमध्ये 65 सामने खेळले आहेत,''अशी माहिती आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेने दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर केवळ 218 धावा आहेत आणि त्यात एकमेव ( 61*) अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 30 जुलै 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 23 मे 2006मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. शिवाय त्यानं 2008 -2014 या कालावधीत इंडियन प्रीमिअर लीगमध्ये डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
वेणुगोपाळ म्हणाला,'' 1990च्या दशकात आंध्रच्या तरुणानं भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असल्याचे सांगितल्यात सर्व त्याच्यावर हसायचे. एमएसके प्रसाद आणि मी आम्ही आंध्रच्या खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशाखापट्टणम येथील लहानशा गावातील माझा जन्म. 7000 रुपयांच्या पगारात माझ्या वडिलांनी आम्हा पाच मुलांना वाढवले. त्यात माझं स्वप्न मोठं होतं. मी जो कोणी आहे त्याचे श्रेय पालकांना जाते.''
cपदार्पणाच्या सामन्यात मुथय्या मुरलीधरनचा सामना करणे, हा क्षण अविस्मरणीय होता, असे तो सांगतो. तो म्हणाला,''फिरकी गोलंदाजांचा सामना करूनच मी घडलो, परंतु मुथय्याचा सामना करताना मला काहीच सुचत नव्हते. तो दिग्गज गोलंदाज होता.''