नवी दिल्ली - कसोटीमधील विश्वविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व हे अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. मात्र अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी निवड करण्याच्या निर्णयावर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे.
याबाबत आकाश चोप्रा म्हणाला की, अजिंक्य रहाणेला कर्णधार म्हणून तुम्ही निवडले आहे. मात्र वास्तव हे आहे की, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये त्याची निवड होणार की नाही हा प्रश्न होता. मात्र इंग्लंड आणि भारत यांच्यातील तो शेवटचा सामना होऊ शकला नाही. मला खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणे आवडतो. मात्र वास्तव हे आहे की, त्याच्या सरासरीमध्ये घसरण धालेली दिसत आहे. मध्ये मध्ये त्याने काही चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत त्याची सरासरी २० च्या आत आली आहे. रहाणेची सरासरी एवढी खाली कधी आली नव्हती, असे आकाश चोप्रा म्हणाला.
जर अजिंक्य रहाणेने लॉर्ड्स कसोटीत अर्धशतक फटकावलं नसतं तर त्याची पुढची वाटचाल कठीण होती. त्या अर्धशतकाने त्याला संघाबाहेर होण्यापासून वाचवले. आता न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका अजिंक्य रहाणेसाठी त्याच्या कारकीर्दिच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असेही आकाश चोप्राने नमूद केले.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिल्यापासून अजिंक्य रहाणेची बॅट शांत आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत एक दोन अपवाद वगळता रहाणेला चमक दाखवता आली नाही. तसेच इंग्लंड दौऱ्यातही तो सपशेल अपयशी ठरला होता. मेलबर्न कसोटीनंतर झालेल्या ११ कसोटी सामन्यात केवळ १९ च्या सरासरीने त्याने ३७२ धावा केल्या आहेत.