IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज दिली.... गुजरात टायटन्सची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतलेल्या हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले गेले... रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली MI ने पाच जेतेपदं पटकावली आणि आता भविष्याचा विचार करून हार्दिककडे सूत्रे सोपवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयांमुळे चाहते नाराज झाले आहेत, काहींनी सोशल मीडियावर तो राग व्यक्तही केला. पण, हार्दिकला कर्णधार करण्याच्या निर्णयाचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी स्वागत केले आहे.
मोठी बातमी! IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ?
हार्दिकच्या नेतृत्वाखाली मागील दोन पर्वात गुजरात टायटन्सने दोन फायनल्स खेळल्या. त्यात पदार्पणातच गुजरात टायटन्सने जेतेपद नावावर केले. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची गाडी रुळावरून घसरलेली पाहायला मिळाली. गावस्कर म्हणाले, ''हे चूक की बरोबर याचा निष्कर्ष आताच काढणे चुकीचे ठरेल, परंतु हा निर्णय संघाचे हित पाहूनच घेतला आहे, हे समजून घ्या. मागील दोन वर्षांतील रोहित शर्माचे योगदान पाहा, फलंदाजीतही त्याला फार योगदान देता आलेले नाीह. तो पूर्वी मोठी खेळी करायचा, परंतु दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सला नवव्या किंवा दहाव्या क्रमांकावर समाधानी रहावे लागले होते आणि मागील वर्षी ते प्ले ऑफ पर्यंत पोहोचले होते."
''जो रोहित आपल्याला पाहण्याची सवय झाली आहे, तो मागील काही वर्षांत हरवलेला दिसला. सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे कदाचित तो दमत असेल. शिवाय त्याच्याकडे भारतीय संघाचे व फ्रँचायझीचे कर्णधारपद असल्यानेही त्यात तो थकवा निर्माण झाला असावा आणि त्याचा कामगिरीवर परिणाम झाला असेल,''असेही गावस्कर म्हणाले. त्यांनी पुढे म्हणले की,''हार्दिक पांड्या युवा कर्णधार आहे आणि तो सकारात्मक निकाल देत आहे, हेच विचारात घेऊन हा निर्णय घेतला गेला असावा. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने दोन फायनल खेळल्या आणि २०२२ मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले. हे सर्व लक्षात घेऊनच त्याच्याकडे मुंबई इंडियन्सची जबाबदारी सोपवली गेली असावी. हा निर्णय मुंबई इंडियन्सच्या भल्यासाठीच घेतला गेला आहे, हे समजून घ्यायला हवं.''