IPL 2023 । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा कोरोना संक्रमित आढळला आहे. आपल्या अप्रतिम समालोचनाच्या कौशल्यामुळे चाहत्यांच्या मनात जागा केलेल्या आकाश चोप्राने ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. तसेच काही दिवस आयपीएल २०२३ मध्ये समालोचन करणार नसल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे.
दरम्यान, आकाश चोप्रा सध्या आयपीएल २०२३ मध्ये जिओ सिनोमावर हिंदीमध्ये समालोचन करत आहे. त्याने ट्विट करत म्हटले, "होय, कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला केला आहे. नाजूक लक्षणे आढळली आहेत. सर्वकाही व्यवस्थित आहे. पण काही दिवसांसाठी समालोचनाच्या कामापासून दूर राहीन... आशा आहे लवकरच बरा होऊन परतेन."
समालोचनाच्या क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आकाश चोप्रा हा हिंदी समालोचन क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा आहे. त्याने आपल्या समालोचनाच्या अप्रतिम शैलीच्या जोरावर चाहत्यांच्या मनात जागा केली आहे. आयपीएल २०२३ पूर्वी त्याने जिओ सिनेमासोबत करार केला. यापूर्वी तो स्टार स्पोर्ट्स नेटवर्कसाठी काम करत होता.
आकाश चोप्राने ऑक्टोबर २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर २००४ मध्ये खेळला होता. त्याने त्याच्या या छोट्याशा कारकिर्दीत एकूण १० कसोटी सामने खेळले असून २३च्या सरासरीने ४३७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"