भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दोनवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी ५-५ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांची आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून गणना केली जाते. तर, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची गणना जागितक क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाजांमध्ये केली जाते. रोहित शर्माने अनेकदा आपल्या फलंदाजीने विरोधी संघाच्या कर्णधार आणि गोलंदाजांची झोप उडवली आहे.
खरं तर रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने भारताचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरची देखील झोप उडवली होती. याचा खुलासा खुद्द गौतम गंभीरने केला आहे. गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गंभीर रोहित शर्माबद्दल भाष्य करत असल्याचे दिसते. गौतम गंभीरने जुन्या आठवणींना उजाळा देताना एक किस्सा सांगितला. गंभीरने सांगितले की, जेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. तेव्हा रोहित शर्माच्या स्फोटक खेळीने व्यथित झाला होता. रोहितने आपली झोप उडवली असल्याचे त्याने सांगितले. एकूणच रोहित शर्मा ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सपेक्षा स्फोटक फलंदाज असल्याचे गंभीरने म्हटले.
रोहित सर्वात स्फोटक फलंदाज - गंभीर "जेव्हा मी व्हिज्युअल्स पाहायचो तेव्हा म्हणायचो की, ठीक आहे, प्लॅन ए बरोबर आहे. पण रोहित शर्मासाठी हा प्लॅन कामी आला नाही तर काय होईल याचा मी रात्रभर विचार करायचो. जर सुनील नरेनने सुरुवातीलाच ४ षटके पूर्ण केली असतील तर अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी कोण करणार? सुनीलची षटके संपली आहेत आणि रोहित शर्मा खेळपट्टीवर आहे हा विचारच माझी झोप उडवायचा. रोहित अशा स्थितीत एका षटकात ३० धावा काढू शकतो", असेही गंभीरने नमूद केले.
दरम्यान, आगामी आयपीएल हंगामासाठी गौतम गंभीरची कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात घरवापसी झाली आहे. केकेआरच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून गंभीर दिसणार आहे. मागील दोन हंगामात तो लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला मार्गदर्शन करत होता.