Join us  

"माजी क्रिकेटपटूंना मसाल्याचीच गरज असते...", राहुलच्या समर्थनार्थ गंभीरचा टीकाकारांवर 'प्रहार'

gautam gambhir : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने लोकेश राहुलवर टीका करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 8:02 PM

Open in App

gautam gambhir on kl rahul । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेलोकेश राहुलवर टीका करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटींमधून राहुलला वगळण्यात आले होते आणि उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. कसोटी मालिकेतील फ्लॉप शोनंतर व्यंकटेश प्रसादसह अनेकांनी राहुलची कसोटी संघातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. यावरून गंभीरने राहुलच्या टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात राहुलने अर्धशतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आणि आता लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरनेही व्यंकटेश प्रसादचे नाव न घेता आपल्या संघाचा कर्णधार लोकेश राहुलचा बचाव केला आहे. राहुलच्या समर्थनार्थ गंभीरने म्हटले आहे की, अनेक माजी क्रिकेटपटू प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी हे सर्व करत असतात.

गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटले, "कसला दबाव? मागच्या वेळी आम्ही (लखनौ सुपर जायंट्स) तिसऱ्या क्रमांकावर आलो होतो आणि राजस्थान रॉयल्स आणि आमच्यात चुरशीची लढत झाली होती. साहजिकच एकच संघ ट्रॉफी जिंकू शकतो. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या गुजरातने आयपीएल जिंकली. मागील हंगामात आम्ही उत्तम क्रिकेट खेळलो. लखनौच्या पदार्पणाच्या हंगामातील कामगिरी पाहिल्यास ती चांगली आहे." 

लोकेश राहुलचे केले कौतुक पुढे बोलताना गंभीर म्हणाला, "लोकेश राहुलबद्दल बोलायचे झाले तर, तो कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली आहे असे मला वाटत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल खूप वेगळे आहेत. तुम्ही आयपीएलमध्ये 1000 धावा करूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा न केल्यावर टीका होत असते. जर तुम्ही कामगिरी केली नाही तर तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. शेवटी फक्त 15 खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमध्ये 150 पेक्षा जास्त खेळाडूंची निवड केली जाते. त्यामुळे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तुलना करू नये."

गंभीरचा टीकाकारांवर प्रहारतसेच राहुलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, टूर्नामेंटमध्ये त्याची 4-5 शतके आहेत. तुम्ही त्या खेळाडूबद्दल बोलत आहात ज्याने आतापर्यंत 4-5 शतके झळकावली आहेत. मागील हंगामातही त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. आमच्या इथे खूप लोक आहेत. कधीकधी माजी क्रिकेटपटूंना सक्रिय राहण्यासाठी काही मसाला हवा असतो. म्हणूनच ते खेळाडूंवर टीका करत असतात. माझ्या मते लोकेश राहुल ज्या प्रकारचा खेळाडू आहे, तो कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली राहत नाही, असे गंभीरने अधिक सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :लोकेश राहुलगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App