david warner ipl 2023 | नवी दिल्ली : आयपीएल २०२३चा हंगाम दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील संघाला आपल्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण शानदार पुनरागमन करत दिल्लीने सलग दोन विजय मिळवले. विजयाची हॅटट्रिक मारण्याच्या तयारीत असलेल्या दिल्लीच्या स्वप्नावर काल सनरायझर्स हैदराबादने पाणी टाकले. हैदराबादने दिल्लीचा त्यांच्या घरात ९ धावांनी पराभव केला. सततच्या पराभवामुळे कर्णधार वॉर्नरला लक्ष्य केले जात आहे. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने कर्णधार बदलण्याची मागणी केली आहे.
सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला खाते देखील उघडता आले नाही. याशिवाय वॉर्नरच्या स्ट्राईक रेटवरून देखील त्याच्यावर टीका केली जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदा प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, असे हरभजनने म्हटले आहे. डेव्हिड वॉर्नरची खिल्ली उडवताना भज्जीने म्हटले, "काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या आव्हानाच्या जवळ पोहचला कारण वॉर्नर शून्यावर बाद झाला होता. जर त्याने ५० चेंडू खेळले असते तर दिल्ली कॅपिटल्सने ५० धावांनी सामना गमावला असता."
कर्णधार बदलण्याची गरजतसेच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची धुरा अक्षर पटेलच्या खांद्यावर द्यायला हवी असे भज्जीने म्हटले आहे. अक्षरला कर्णधारपद दिल्यास संघात सुधारणा होईल. आयपीएलच्या साखळी फेरीतील उरलेले सहा सामने दिल्लीसाठी जिंकणे गरजेचे आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने संघात बदल केल्यास निकाल वेगळा येऊ शकतो, असे हरभजनने अधिक म्हटले.
दिल्लीच्या विजयाची हॅटट्रिक हुकलीयंदाच्या हंगामात दोन सामने जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्लीचा त्यांच्याच घरात पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारित २० षटकांत ६ बाद १९७ धावा केल्या. १९८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना घाम फुटला आणि संघ केवळ १८८ धावा करू शकला. अखेर हैदराबादने ९ धावांनी शानदार विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"