नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली यांच्यातील वाद नवीन नाही. अनेकवेळा हे दोन्ही क्रिकेटपटू आमनेसामने आले आहेत. खरं तर विराट कोहलीशिवाय गंभीरचे महेंद्रसिंग धोनीशी देखील संबंध चांगले नव्हते. गंभीरने अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी याबाबत भाष्य केले आहे, ज्यावरून धोनी त्याला फारसा आवडत नव्हता हे स्पष्ट होते. आयपीएल २०२३ मध्ये देखील विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला.
गंभीर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे, तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. १ मे रोजी झालेल्या आरसीबीविरूद्ध लखनौच्या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. दोन्हीही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच गंभीरबद्दल भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पठाणचा मोठा गौप्यस्फोट खरं तर काल लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होत होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला. या सामन्यापूवी झालेल्या चर्चा सत्रात इरफान पठाणने म्हटले होते, "जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा कर्णधार गौतम गंभीर होता, तेव्हा तो महेंद्रसिंग धोनीच्या अहंकारासोबत खेळला होता. मागील काही वर्षांत तो एकमेव खेळाडू आहे, जो धोनीला अडचणीत आणण्यात यशस्वी झाला होता." लक्षणीय बाब म्हणजे त्यावेळी धोनीसह इरफान पठाण पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होते. इरफान पठाणने सांगितले की, धोनी यामुळे खूप त्रासला होता.
२०१६ मध्ये पुणे सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत होता. तेव्हा केकेआरच्या संघाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर होती. त्यावेळी गंभीरने धोनीविरूद्ध कसोटी क्रिकेटसारखे क्षेत्ररक्षण लावले होते. या सामन्याची मोठ्या कालावधीपर्यंत चर्चा झाली होती. गंभीरच्या नेतृत्वात दोनवेळा केकेआरच्या संघाने आयपीएलचा किताब जिंकला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"