Virat Kohli vs Gautam Gambhir । मुंबई : आयपीएल २०२३चा हंगाम अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक हे या वादात केंद्रस्थानी होते. या वादानंतर भारतीय संघाचे माजी खेळाडू संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. या आधी सुनील गावस्कर यांनी टीका केली होती. मग अनिल कुंबळेने याला लाजिरवाणे म्हटले आणि आता वीरेंद्र सेहवागनेही बोचरी टीका केली आहे. तुम्ही आदर्श असून मग असे कसे काय वागू शकता असा प्रश्न वीरूने विचारला आहे.
सेहवागने क्रिकबजशी बोलताना म्हटले, "मी तर सामना पाहिल्यानंतर टीव्ही बंद करून झोपलो होतो. सामन्यानंतर काय झालं हे मी पाहिलं नव्हतं. पण सकाळी उठल्यानंतर सोशल मीडियावर पाहिलं तर रान पेटलं होतं. जे झालं ते योग्य झालं नाही. हार जीत होतेच... जिंकणारा संघ आनंद साजरा करून जात असतो. तुम्ही एवढे मोठे खेळाडू आहात, हे आदर्श आहेत देशाचे ते काय करतात, काय बोलतात याचा प्रभाव पडत असतो."
... तर BCCI कारवाई करू शकतेतसेच बीसीसीआयची इच्छा असेल तर ते कोणत्याही खेळाडूवर बंदी घालू शकतात. तसं झालं तर भविष्यात अशा लढाया कमी पाहायला मिळतील, कारण फक्त यावेळीच नाही तर हे वर्षातून एकदा तरी नक्कीच होते. खेळाडू असोत, सपोर्ट स्टाफ असोत किंवा कोणीही असो, कोणीही हे करू नये. हे शोभा देत नाही. बरीच मुले मॅच पाहतात आणि ही वाईट गोष्ट आहे, असे वीरूने अधिक सांगितले.
नेमकं काय झालं होतं?आरसीबी आणि लखनौ यांच्या सामन्यादरम्यान लखनौचा खेळाडू नवीन-उल-हक हा फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजची गोलंदाजी सुरू होती. तेव्हा विराट आणि त्याच्यात काहीतरी बिनसल्याचे पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर या वादाला वेगळे वळण लागले. नंतर लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने मध्यस्थी करून नवीन आणि कोहली यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अफगाणी खेळाडूने विराटला भेटण्यास नकार दिला. तसेच गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात हस्तांदोलन करतावेळी बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"