मुंबईः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विश्रांती दिली आहे. त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहितने ही भूमिका सक्षमपणे वटवताना भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवून दिले. रोहितने सर्व अंदाज चुकवताना भारताला पुन्हा एकदा यश मिळवून दिले. त्याच्या नेतृत्व कौशल्यावर भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण खूप प्रभावित झाला आहे.
''रोहितच्या नेतृत्वाने मला जबरदस्त प्रभावित केले आहे. तो या भूमिकेशी समरस झाला आहे, विशेषतः ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आणि त्याची कामगिरीही प्रशंसनीय झालेली आहे. मैदानावर तो फार सक्रिय असतो आणि त्याच्याकडे रणनीती तयार असते,'' असे लक्ष्मण म्हणाला.
रोहितकडे नियमितपणे कर्णधारपद आलेच नाही. 31 वर्षीय रोहितने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची धुरा सांभाळली होती आणि भारताने जेतेपदही पटकावले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेंटी-20 मालिकेतही भारताने 3-0 असा विजय मिळवला. कर्णधारपदाच्या भूमिकेचे दडपण न घेता रोहित फलंदाजीतही आपली छाप सोडत आहे. ट्वेंटी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित ( 121) दुसऱ्या धावांवर आहे. लखनौ येथील सामन्यात त्याने दमदार शतकही झळकावले होते.