भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील सलामीच्या दोन्हीही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. खरं तर या मालिकेत भारतीय संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. संजू सॅमसन मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियासाठी खेळत आहे. अशातच खराब फॉर्ममुळे सॅमसन टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने सॅमसनवर सडकून टीका केली. त्याला संधी मिळते तेव्हा तो त्याचा फायदा घेत नाही, असे त्याने म्हटले.
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना येत असलेले अपयश टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. सॅमसनला देखील पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या सामन्यात तो सात चेंडूत सात धावा करू तंबूत परतला. याचाच दाखला देत पार्थिव पटेलने भारतीय खेळाडूला खडेबोल सुनावले.
पार्थिव पटेलने सॅमसनला सुनावले
क्रिकबजशी बोलताना पार्थिव पटेलने म्हटले, "जेव्हा जेव्हा भारतीय संघ पराभूत होतो तेव्हा आपण नकारात्मक गोष्टींकडे पाहतो. वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान दीर्घकाळ खेळू शकतील अशा फलंदाजांची गरज आहे, अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगते. जेव्हा जेव्हा सॅमसन संघाचा भाग नसतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलतो पण त्याने मिळालेल्या संधींचा फायदा घेतला नाही. आता त्याला कदाचित जास्त संधी मिळणार नाहीत. त्याला भरपूर संधी मिळाल्या आहेत, पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. या मालिकेत केवळ तिलक वर्मालाच साजेशी खेळी करण्यात यश आले."
हार्दिक सेनेचा सलग दुसरा पराभव पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार हार्दिक पांड्याला भोवला. पण, तिलक वर्माने अर्धशतक झळकावून संघाची लाज राखली. टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने १८.५ षटकांतच लक्ष्य गाठले अन् २ गडी राखून विजय मिळवला.