भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. स्थानिक क्रिकेटपटूंचा मुद्दा हाती घेत, गांगुलीनं पहिल्याच बैठकीत आपला निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर त्यानं बीसीसीआयची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील असेही सांगितले. भारतीय संघाला जगात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारीही गांगुलीनं दाखवली आहे. गांगुलीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आणि म्हणूनच भारताच्या महिला क्रिकेटपटूनंही गांगुली अध्यक्षपदी विराजमान होताच साकडं घातलं आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पूर्णवेळ बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविणारा गांगुली हा दुसरा कर्णधार ठरणार आहे. 65 वर्षांपूर्वी हा मान भारतीय संघाच्या कर्णधाराला मिळाला होता. महाराजकुमार यांनी 1936साली तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर 1954 ते 1956 या कालावधीत त्यांनी बीसीसीआयचे पूर्णवेळ अध्यक्षपद भूषविले होते. 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. लढाऊ कर्णधार म्हणून गांगुलीनं जगभरात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी गांगुलीला एक विनंती केली आहे.
भारतीय महिला कसोटी संघाच्या पहिल्या कर्णधार असलेल्या रंगास्वामी यांनी न्यूझीलंडविरुद्धची 1976-77ची कसोटी मालिका अधिकृत जाहीर करावी, अशी विनंती केली आहे. गांगुलीने हा मुद्दा न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( आयसीसी) मांडावा, अशी आशा रंगास्वामी यांना आहे. 65 वर्षीय रंगास्वामी यांनी पाच सामन्यांच्या त्या मालिकेत 500 हून अधिक धावा केल्या, तर डायना एडुल्जी यांनी 20 पेक्षा अधिक विकेट घेतल्या होत्या. पण, ती मालिका अनधिकृत (Unofficial) असल्यानं हे विक्रम ग्राह्य धरले गेले नाहीत. त्या म्हणाल्या,''न्यूझीलंडचा तो भारत दौरा Unofficial असल्यानं विक्रम ग्राह्य धरले गेले नाही, याचे दुःख वाटते. पण, नव निर्वाचित अध्यक्ष याकडे लक्ष देतील. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.''
भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणाऱ्या भारतीय महिला संघाच्या रंगास्वामी या कर्णधार होत्या. 1976च्या मालिकेत बंगळुरू कसोटीत भारतीय महिलांनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवला होता. रंगास्वामी यांनी 16 कसोटी ( 750 धावा) व 19 वन डे ( 664 धावा) सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. शिवाय त्यांनी कसोटीत 21, तर वन डेत 12 विकेट्स घेतल्या.
Web Title: Former India women's cricket team captain Shantha Rangaswamy Wants New BCCI Boss Sourav Ganguly's Help
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.